जामखेड – अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत. त्यांनी सेवकाप्रमाणे वागावे. जर मुजोरी केली, तर ती जिरवावीच लागते. असा खणखणीत इशारा आ. राम शिंदे यांनी लगावला. आ. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 2) नान्नज ग्रामपंचायत कार्यालयासमोर भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजूश्री जोकरे व महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मनीषा मोहळकर यांच्या पुढाकारातून राज्य ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत उमेद बचतगटांना कर्ज वितरण व लोन मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, सरचिटणीस दिलीप भालसिंग, बाळासाहेब महाडिक, ओबीसी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष मंजूश्री जोकारे, मनीषा मोहळकर, अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप, युवा नेते किशोर जोकारे, जिल्हा व्यवस्थापक बाळासाहेब सरोदे, तालुका व्यवस्थापक रमेश धोत्रे, गोकुळ जायभाय, रवी सुरवसे, सोमनाथ पाचारणे, लहू शिंदे, तुषार पवार, पृथ्वीराज बाकुंजकर, सुनील हजारे, बापूराव ढवळे, पांडुरंग उबाळे, उदय पवार, अनिल हजारे, मजहर पठाण आदींसह महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.
आ. शिंदे म्हणाले की, सन 2019च्या निवडणुकीत माझा पराभव झाला, त्या वेळी माझ्या आईने विजयी आ. रोहित पवार यांचा सत्कार केला. आता मला आमदार होऊन सहा महिने झाले. तरी त्यांनी अद्याप माझा सत्कार केलेला नाही. माझे आई-वडील अशिक्षित असतानाही त्यांनी हे काम केले. मी सहा महिन्यांनी का होईना आमदार झालो. मग त्यांचे आई-वडील सुशिक्षित असतानाही त्यांना हे कसं काय कळत नाही, असा टोला आ. शिंदे यांनी आ. पवार यांना लगावला.
मी आता आमदार आहे. तसेच, राज्यात व केंद्रात आपलीच सत्ता असल्याने बचत गटांना कोणतीही अडचण येऊ देणार नसल्याचे सांगितले. आपले नाव राज्यसभेला प्रदेशाध्यक्षपदासाठी, तसेच विधान परिषदेच्या सभापतिपदासाठी घेतले जाते, हे काय कमी नाही. यावर्षी माझ्या वाढदिवसाचा सप्ताह बसला असून, आपण यासाठी एकही रुपया खर्च केला नाही. सर्व खर्च कार्यकर्त्यांनी उचलल्याचे आ. शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
या वेळी आमदार शिंदे यांच्या हस्ते बचत गटांच्या महिलांना सव्वा कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. मनीषा मोहळकर यांनी बचत गटासाठी उत्तम काम केल्याने त्यांचे आ. शिंदे यांनी कौतुक केले.
मग, सांगा बरं कोण भारी आमदार!
लोक मला नाव ठेवतात की मी मागच्या दाराने आमदार झालोय. उलट पुढच्या दाराने झालेल्या आमदारांना बसण्याची जागा खाली आहे. आमच्यासाठी वरिष्ठ सभागृहात बसण्यासाठी वरती जागा आहे. मग, सांगा बरं कोण भारी आमदार आहे, अशी टीका आ. राम शिंदे यांनी आ. रोहित पवार यांचे नाव न घेता केली.