रांची – भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने कोरोनाचा धोका वाढत असतानाही रांचीच्या रस्त्यावर दुचाकीवर फिरत चाहत्यांबरोबर सेल्फी व फोटो काढण्यात वेळ घालविला. चाहते जरी खूष झाले असले तरीही धोनीच्या बेजबाबदार पणावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) पुढे ढकलण्यात आल्यानंतर तसेच चेन्नई सुपर किंग संघाचे सराव सत्र कोरोनाच्या भीतीने रद्द करण्यात आल्यावर धोनी रांचीला परतला. एकीकडे देशपातळीवर लोकांनी काळजी घ्यावी, आवश्यकता असेल तरच घराबाहेर जावे अशा स्पष्ट सूचना असतानाही केवळ वेळ घालविण्याकरता धोनी घराबाहेर पडला व रांचीच्या रस्त्यावर आपली दुचाकी घेऊन फिरला.
हेल्मेट घातलेले असतानाही चाहत्यांनी त्याला ओळखले व त्याच्याजवळ झुंबड उडाली. धोनीसह सेल्फी घेण्यासाठी तसेच त्याचे फोटो काढण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी झाली होती, मात्र त्याचे कोणतेही शल्य धोनीला वाटले नाही. तो देखील चाहत्यांची मागणी पूर्ण करताना दिसला. संपूर्ण देशात करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असताना धोनीसारख्या एका जबाबदार व्यक्तीने असे आपल्या भोवती गराडा गोळा करत आपल्यासह चाहत्यांच्या जीवाचीही पर्वा न करता अत्यंत बेजबाबदार वर्तन केले. अत्यंत महागड्या गाड्यांची धोनीची आवड तर सर्वश्रुत आहे.
धोनीने आपली महागडी दुचाकी बाहेर काढली व रांचीच्या रस्त्यावर धूम स्टाईल दाखविली. आपल्या लाडक्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. धोनीनेही त्यांना नाराज न करता अनेकांना आपल्याबरोबर सेल्फीदेखील काढून दिली. ज्याच्या खेळातून तसेच त्याच्या वर्तनातून देशातील युवा पिढी प्रेरणा घेते अशा खेळाडूने असे बेजबाबदार वर्तन करावे याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही.
गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर धोनीने आंतरराष्ट्रीय तसेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. धोनी निवृत्ती घेणार का पुनरागमन करणार या चर्चांनी जोर पकडला होता, त्यातच धोनीकडून मीडियालादेखील काहीही सांगण्यात येत नव्हते.