पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रमोद चौगुले याने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे तर रूपाली माने मुलींमध्ये पहिली आली आहे. गिरीश परेकर हा मागासवर्गीय प्रवर्गातून राज्यात पहिला आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. 4, 5 आणि 6 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. एकूण 200 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. मुख्य निकाल व प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (कट ऑफ) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या परीक्षेसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी दि. 29 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
या गुणवत्ता यादीमधील समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. दरम्यान, या निकालाच्या आधारे शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपुस्तिका अथवा उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाइलमध्ये उपलब्ध झाल्याच्या तारखेपासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
अभियांत्रिकी सेवा गुणवत्ता यादी जाहीर
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंगळवारी जाहीर केली आहे. त्यानुसार पसंतीक्रम आणि भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी आयोगाकडून लिंक दि. 1 जून ते 8 जून या दरम्यान सुरू राहणार आहे.