पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा 2021 या अंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात विशाल चौधरी हा राज्यात पहिला आला तर मुलीमध्ये पूजा गवळी पहिली आली आहे. यानंतर यशस्वी उमेदवार आणि त्यांच्या मित्रांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. तर काही ठिकाणी फटाके फोडून जल्लोष केला.
एमपीएससीने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब च्या राज्य कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि पोलिस उपनिरिक्षक या संवर्गासाठी एकत्रित 26 फेब्रुवारी 2022 मध्ये पूर्व परीक्षा घेतली होती. यात राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या 107 पदांसाठी सुमारे 1 हजार 800 हून अधिक उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले होते. मुख्य परीक्षा जून आणि जुलैमध्ये झाल्या.
राज्य कर निरीक्षक परीक्षेत अक्षय पडूळ, नम्रता मस्के अव्वल
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा 2021 राज्य कर निरीक्षक संवर्गाचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात औरंगाबादचा अक्षय पडूळ, तर मुलींमध्ये नम्रता मस्के अव्वल ठरले. एमपीएससीने 26 फेब्रुवारी 2022 मध्ये पूर्व परीक्षा घेतली होती. यात राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या 609 पदांसाठी सुमारे 10 हजारांहून अधिक उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले होते. यातील 609 पदांसाठी गुनवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी बुधवारी आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.
“अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे. ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असल्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अनेक अडचणी आल्या. पण, मला आई-वडील आणि भावाचे सहकार्य व प्रोत्साहन मोलाचे ठरले.”
– विलास भोसले, उत्तीर्ण उमेदवार
“सतत येणाऱ्या अपयशात खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे यश मिळावता आले. आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण झाल्याचे समाधान वाटते. आजचे यश त्यांच्या चरणी अर्पण करतो.”
– सागर परिहार, उत्तीर्ण उमेदवार
“केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अनेक मुख्य परीक्षा देऊनही खूप कमी गुणांनी यश हुलकावणी देत होते. पण, खचून न जाता सातत्य आणि संयम ठेवला तर यश नक्की मिळते. या यशात आई-वडील, भाऊ आणि चुलते यांच्या भक्कम पाठिंब्याचा मोठा वाटा आहे.”
– संदीप खलाटे, राज्य विक्रीकर निरीक्षक
“मी शेतकरी परिवारातील असून, सुरुवातीला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देत होतो. कोविड काळातील परिस्थिती पाहता टिकून राहणे कठीण होते. तरी अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे मला यश मिळाले. इतर परीक्षार्थींनी खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे.”
– महेश पठारे, सहायक कक्ष अधिकारी