पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 4 ते 6 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा-2020 च्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात 615 उमेदवार मुलाखतीस पात्र ठरले आहेत. मुलाखतीचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. पात्र ठरलेल्यांत पुणे केंद्रातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक म्हणजे 443 आहे. मुख्य परीक्षेच्या निकालाचा कटऑफही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षेमधून मुलाखतीसाठी पात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपुस्तिकेतील गुणांची फेरतपासणी करावयाची आहे, त्यांनी गुणपत्रके प्रोफाइलमध्ये प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांच्या आता आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. अर्जात नमूद केलेली माहिती अथवा चुकीची आढळून आल्यास त्यांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.