पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागातील प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. सोनवणे हे बुधवारी (दि.1 जून) प्र-कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांचा कार्यकाल संपुष्टात आला होता. त्यानंतर राज्यपालांनी प्रभारी कुलगुरू म्हणून लोणेरे येथील तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे पुणे विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. परंतु प्र-कुलगुरू पद रिक्त होते. त्या ठिकाणी आता डॉ. संजीव सोनवणे हे प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेणार आहेत.
विद्यापीठातील अधिष्ठाता पदाची नियुक्ती सोमवारी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच प्र-कुलगुरूपदी डॉ. सोनवणे यांची निवड करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. डॉ. सोनवणे हे विद्यापीठाच्या आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळा याचे कामकाज सुरू आहे. सोनवणे हे राष्ट्रीय स्तरावरील शिखर संस्थांच्या परिषदेचे म्हणून सदस्य कार्यरत आहेत.