पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) सोमवारी पुणे आणि नाशिक येथे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षांच्या मुलाखती आयोजित केल्या आहेत. मात्र सोमवारच्या पुणे बंदमुळे या मुलाखतीस उपस्थित राहू न शकणाऱ्या किंवा उपस्थित राहू इच्छित नसलेल्या उमेदवारांच्या अन्य दिवशी मुलाखती घेतल्या जातील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
आयोगाने रविवारी रात्री ट्विट करीत ही माहिती दिली. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 च्या 11 ऑक्टोबर 2021 रोजी नाशिक आणि पुणे जिल्हा केंद्रावर आयोजित मुलाखतीस उमेदवारांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अभावी उपस्थित राहण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 च्या उद्या दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी नाशिक व पुणे जिल्हा केंद्रावर आयोजित मुलाखतीस उमेदवारांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अभावी उपस्थित राहण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. 1/2
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) October 10, 2021
मुलाखतीस उपस्थित राहू शकत नाहीत किंवा उपस्थित राहू इच्छित नसलेल्या उमेदवारांनी ईमेलद्वारे आयोगास विनंती केल्यास त्यांची मुलाखत अन्य दिवशी आयोजित करण्यात येईल, असे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.