मॉस्को – रशियातील तातरस्तान भागात झालेल्या एका विमान अपघातात किमान 15 जण ठार झाले आहेत. एल-410 हे छोटे प्रवासी विमान या भागात कोसळले. या विमानात पॅरेशूट जंपर्स होते, असे आपत्कालीन मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
विमान अपघातानंतर 7 जणांना विमानाच्या अर्धवट जळालेल्या सांगाड्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे, असेही या वृत्तामध्ये म्हटले आहे. 410 टर्बोलेट हे मध्यम पल्ल्यासाठीचे प्रवासी विमान होते.
रशियाच्या हवाई वाहतुकीच्या सुरक्षितता निकषांमध्ये अलीकडेच खूप सुधारणा करण्यात आली आहे. मात्र, अनेक जुन्या विमानांचा वापर निकष ओलांडून गेले तरी सुरूच राहिल्यामुळे विमानांचे अपघात अजूनही होतच आहेत.
गेल्याच महिन्यात रशियाच्या पूर्वेकडे ऍन्टनी ऍन-26 विमान कोसळून झालेल्या अपघातात 6 जण ठार झाले होते. तर कामचातका भागात जुलै महिन्यात असाच ऍन्टनी ऍन- 26 विमानाचा अपघात झाल्याने विमानातील सर्वच्या सर्व 28 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.