मुंबई – अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या विविध विषयांवर आपले परखड मत व्यक्त करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल प्रकरणी उठवलेल्या आवाजाला पाठींबा देत त्यांचे समर्थन केले होते. याबाबत तिने सोशल मीडियावर देखील स्पष्टपणे भाष्य केले होते. त्यानंतर आता तिने बिकिनी परिधान केलेल्या अभिनेत्रींना सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. यावरही तिची भूमिका मांडली आहे.
एका मुलाखतीदरम्यान तेजस्विनी पंडित म्हणाली की, “मला एखादे कपडे आवडतात आणि ते मी घातले यात काहीच गैर नाही. बिकिनी ही स्विमिंग पूलमध्ये नाही घालणार, तर कुठे घालणार? त्यामुळे तुम्हाला तुमच्या पद्धतीने जगायचे की, लोकांना काय वाटतं त्यानुसार जगायचंय हे तुमचं तुम्हाला ठरवावं लागणार आहे.”
पुढे ती म्हणाली, “स्वत:च्या मताप्रमाणे जगायचं ठरवलं की, बिकिनी घालून फोटो टाकल्यावर खालच्या कमेंट्स वाचायच्या नाहीत. त्या फोटोंवरुन कोणी ट्रोल केलं तरीही फरक पडता कामा नये. जर अशा लोकांकडे दुर्लक्ष करायला जमत नसेल, तर लोकांना पाहिजे तसे वागावे लागते. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलणं ही सोशल मीडियावरची खूप मोठी समस्या आहे.” असे परखड मत तेजस्विनी पंडितने व्यक्त केले.
यावेळी तिने कमेंट करण्यासाठी पैसे आकारण्याची मागणी देखील केली. सोशल मीडियावरील प्रत्येक कमेंटसाठी कमीत कमी दहा रुपये जरी आकारले पाहिजेत. जेणेकरून लोक असले प्रकार करणार नाहीत आणि कमेंट्सचं स्वरुप बदलेल, अशी मागणी तिने केली.