नवी दिल्ली –पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसच्या दोन खासदारांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे बंधू दिब्येंदू यांचाही समावेश आहे. (MPs Arjun Singh, Dibyendu Adhikari join BJP)
संदेशखाली प्रकरणामुळे नाराज असल्याचे कारण देत दिब्येंदू आणि अर्जुन सिंह यांनी तृणमूलला रामराम ठोकला. मात्र, त्यांचा तो राजकीय निर्णय अपेक्षित स्वरूपाचा मानला जात आहे. भाजपचे प्रमुख नेते अधिकारी यांचे बंधू असल्याने दिब्येंदू लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलमधून बाहेर पडतील, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. तृणमूलने नुकतेच आपले उमेदवार जाहीर केले. त्यामध्ये सिंह यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांचाही भाजप प्रवेश अनपेक्षित ठरलेला नाही.
दोन्ही खासदारांनी पक्ष बदलताना संदेशखाली प्रकरण उपस्थित करत भाजपची रणनीती अवलंबली. तृणमूलचा वादग्रस्त नेता शाहजहान शेख आणि त्याच्या समर्थकांनी संदेशखालीत अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणावरून भाजपने आक्रमक पवित्रा स्वीकारत तृणमूलला घेरले आहे.