इंदूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे माजी प्रमुख दिवंगत एम.एस. गोळवलकर यांच्यावर सोशल मीडियात वादग्रस्त पोस्ट टाकल्याच्या आरोपावरून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात इंदुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरएसएस कार्यकर्ता राजेश जोशी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर, शनिवारी रात्री सिंह यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 153-ए (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थानाच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.
त्याखेरीज त्यांच्या विरोधात कलम 469 (प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने खोटारडे आरोप करणे), 500 (बदनामीकरणे) आणि 505 अंतर्गतही त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
जोशी यांनी त्यांच्या तक्रारीत आरोप केला आहे की, दिग्विजयसिंह यांनी दलित, मागासवर्गीय, मुस्लिम आणि हिंदू यांच्यात संघर्ष निर्माण करून लोकांना भडकवण्यासाठी गोळवलकर यांचे नाव वापरून फेसबुकवर पोस्ट टाकली.
त्यामुळे संपुर्ण हिंदु समाजाच्या भावना दुखावल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. गोळवलकर हे 1940 ते 73 या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख होते.