भोपाळ :- समाजवादी पक्षाने मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे योजले आहे. समाजवादी पक्ष हा विरोधकांच्या इंडिया आघाडीचा पक्ष आहे. परंतु मध्यप्रदेशात तेथे आमची कॉंग्रेसबरोबर युती होण्याची शक्यता कमी आहे, असे मध्यप्रदेशचे सपा प्रदेशाध्यक्ष रामायण सिंह पटेल यांनी म्हटले आहे.
या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने आणखी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली असून, त्यांच्या मध्यप्रदेशातील उमेदवारांची संख्या सहा झाली आहे.
रामायण सिंह म्हणाले की, कोणत्याही राज्यातील युतीबाबतचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व घेते. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशात अशी युती होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. पण, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष याबाबत निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
मध्यप्रदेशात निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी समाजवादी पक्षाने तेथे आपले उमेदवार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बहुजन समाज पक्ष आणि भाजपने या आधीच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेशात समाजवादी पार्टीचा एक आमदार निवडून आला होता.