पिंपरी – राज्यातील खासगी शिक्षण संस्था आणि इंग्लिश मीडियम शाळांसमोर असंख्य समस्या आहेत. शाळांसाठी आवश्यक असणाऱ्या परवानगी आणि आरटीई परतावा या महत्त्वाच्या समस्या आहेत, असे मत उद्योजक व महाराष्ट्र राज्य इंग्लिश मिडीयम स्कूल या संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष संदीप काटे यांनी व्यक्त केले.
दैनिक प्रभातच्या पिंपरी चिंचवड विभागीय कार्यालयात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या वेळी दिलेल्या मुलाखतीत काटे बोलत होते. पुढे बोलताना काटे म्हणाले, खासगी शिक्षण संस्थांना राज्य शासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही. तसेच शासकीय योजनांचा लाभ विनाअनुदानित खासगी संस्थांना मिळत नाही. परंतु शासनाकडून आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी खासगी संस्थांना आग्रह केला जात आहे. कोणताही लाभ न देता शासकीय नियमांचे पालन आमच्याकडून घेतले जाते. खासगी संस्था आरटीई विद्यार्थ्यांना शिक्षण देखील देत आहेत. परंतु त्याबदल्यात शासन संस्थांना वेळेत परतावा दिला जात नाही. त्यामुळे खासगी संस्थांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
पुणे जिल्हा हे शिक्षणाचे माहेरघर आहे. पुण्यातून सर्व शैक्षणिक क्षेत्रातील परवानगी, अथवा कामे चालतात. शिक्षण संचालक मंडळाकडून शाळांना लागणाऱ्या सर्व परवानग्या देण्यात येत होत्या. परंतु सध्या बहुतांशी परवानगी पुण्यातून मिळत नाहीत. त्यासाठी मुंबईला मंत्रालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे खासगी संस्थाचालकांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. शासनाने शाळेसंबंधीच्या सर्व परवानग्या पूर्वी प्रमाणे पुण्यातून देण्यास सुरुवात करावी.
बांधकाम व्यवसायाला महागाईचा फटका
मागील दोन वर्षे करोना महामारीमुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत होता. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला न झाला तोच इंधन दरवाढीचा आणि इतर बांधकाम साहित्यांची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने देखील बांधकाम व्यवसाय सध्या अडचणीत आला आहे. त्यामुळे महागाई आटोक्यात येऊन बांधकाम क्षेत्राला पुन्हा तेजी आणि शैक्षणिक अडथळे कमी व्हाव्यात, अशी मागणी काटे यांनी गणपती बाप्पाकडे केली आहे.