हतीया (झारखंड): चार महिन्यांच्या तान्हुल्याला भूक लागल्याचे लक्षात येताच रेल्वे स्थानकाजवळील आपल्या घरातून धावत पळत जाऊन दूध आणून देण्याची समय सुचकता येथील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने दाखवली. त्यामुळे खाकी वर्दीतील आई अशी तिची सोशल मीडियावर ओळख निर्माण झाली आहे.
त्याचं झालं असं… आपल्या चार महिन्यांच्या तान्हुल्यासह मेहरुन्निसा या बंगळुरूहून गोरखपूरला श्रमिक एक्स्प्रेसने जात होत्या. हातिया स्थानकात रेल्वे येताच आपल्या तान्हुल्यासाठी दूध मिळते का ते पाहू लागल्या. मेहरुन्निसा यांनी बंदोबस्तावर असणाऱ्या सहाय्यक उपनिरीक्षक सुशीला बाराईक यांना दूध कोठे मिळेल, असे विचारले. तान्ह्या बाळाला दुधाची गरज आहे हे लक्षात येताच क्षणाचीही उसंत न घेता त्या स्थानकाशेजारी असणाऱ्या आपल्या घरात धावत गेल्या.
घरातून दुधाची बाटली भरून घेत त्यांनी पळत येत मेहरून्निसा यांच्या हातात दिली. एका बाजूला धर्म आणि द्वेषाचे विखार ओतले जात असताना सुशीला यांनी मानवतेचा एक आदर्श घालून दिला. एवढेच नव्हे तर खाकी वर्दीतील महिलेतही एक मातेचे हृदय असते याचा प्रत्यय दिला.