शिक्रापूर -कासारी (ता. शिरूर) येथील जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरण करून बनावट खरेदीखत केल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या असताना आता चक्क शिक्रापूर येथे असलेल्या मॉलचालक मुलीनेच स्वतःच्या वडिलांना फसवून जमिनीचे खरेदीखत केले असल्याची माहिती समोर आली असून याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
किसन गंगाराम भूमकर यांनी तक्रार दिली आहे. मार्च 2020 मध्ये भूमकर यांची मुलगी व जावई यांनी भूमकर यांना तळेगाव ढमढेरे येथे कर्ज काढण्यासाठी जायचे आहे असे सांगून नेले आणि तेथे गेल्यावर एका कागदावर अंगठा घेतला, त्यानंतर भूमकर यांना संशय आल्याने त्यांनी घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यांच्या नातवांनी सोमवारी (दि. 15) तळेगाव ढमढेरे येथील दस्त नोंदणी कार्यालयातून याबाबत दस्त काढला असता भूमकर यांची मुलगी व जावई यांनी भूमकर यांना फसवून त्यांच्या जमिनीचे खरेदीखत करून त्यामध्ये 56 लाख रुपये रक्कम दाखवली.
मात्र, भूमकर यांना कोणतीही रक्कम न देता फसवून खरेदीखत केल्याचे समोर आले. याबाबत मुलगी व जावयास विचारले असता त्यांनी अशी धमकी दिली आहे. तरी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रार अर्जात केली आहे.पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी म्हणाले की, हा प्रकार फसवणुकीचा असून त्या तक्रारीची चौकशी करून वरिष्ठ कार्यालयास माहिती पाठवून वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी घेऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.