रुग्णवाढीचा दर दहा टक्क्यांवर : एकाचा मृत्यू, 20 दिवसांत 65 टक्क्यांनी वाढले रुग्ण
पिंपरी – शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी शंभरहून अधिक जणांना “करोना’ची लागण झाली आहे. जून महिन्यात “करोना’च्या उद्रेकामुळे पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचा दर 10 टक्क्यांच्यावर गेला आहे. हाच दर एप्रिल महिन्यात 3 टक्के होता. तर 1 जून रोजी रुग्ण दरवाढीची टक्केवारी 8.36 टक्के इतकी होती. शहरातील एकूण रुग्णसंख्या 1569 एवढी झाली आहे. तर मृतांचीही आकडेवारी वाढत आहे. आजपर्यंत शहरातील 27 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी शहरातील 95 रुग्णांचा आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेणाऱ्या 9 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
करोना विषाणूच्या संक्रमणाला सुरुवात झाली तेव्हा शहरातील रुग्णवाढीचा दर हा 2 ते 3 टक्क्यांवर होता. हा दर वाढत जाऊन 1 जून रोजी रुग्ण दरवाढीचा दर 8.36 टक्के झाला होता. 1 जून या दिवशी एकूण रुग्णांची संख्या 535 इतकी होती. तर तोपर्यंत 6097 संशयित रुग्णांचे अहवाल तपासणीस पाठविण्यात आले होते. तर शहरातील 8 रुग्णांचा मृत्यू झाला होता. जून महिन्याच्या 20 दिवसांमध्ये मृतांमध्ये वाढ होऊन सरासरी रोज एक मृत्यू याप्रमाणे 19 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर रुग्णसंख्येमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे.
गेल्या 20 दिवसांत तब्बल 1064 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानुसार दररोज सरासरी पन्नासहून अधिक रुग्णांना करोनाची लागण होत आहे. आजपर्यंत 12 हजार 864 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. “करोना’ची लागण होण्याची टक्केवारी एकूण संशयित रुग्णांच्या प्रमाणानुसार 10.35 टक्के इतकी आहे.
शहरातील प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या खऱाळवाडी, इंदिरानगर चिंचवड, संत तुकारामनगर पिंपरी, काळेवाडी, घरकुल, गांधीनगर, यमुनानगर, जगताप डेअरी, मोहननगर, मोरवाडी भाटनगर, बिजलीनगर, दापोडी येथील रुग्णांचे अहवाल पॉझिट्विह आले आहेत. तर शहराबाहेरील चिंचोली आंबेगाव व मंगळवार पेठ येथील 9 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. तसेच शहरातील नढेनगर काळेवाडी येथील 48 वर्षीय पुरुषाचा करोनामुळे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील एकूण मृतांची संख्या 27 झाली आहे. तर शहराबाहेरील 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत शहरात शहरातील 579 व शहराबाहेरील 56 अशा 635 रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात 30 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. आजपर्यंत 954 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज शहरातील साईबाबानगर चिंचवड, जुनी सांगवी, दिघी, बेलठीका नगर थेरगाव, काळभोरनगर, भारतमातानगर पिंपरी, ममतानगर, पिंपरी, खेड व खडकी येथील रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. तर दिवसभरात 765 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वॅब पाठवल्यापैकी 392 रुग्णांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. एकीकडे शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच बाहेरुन येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. सध्या 56 बाहेरील रुग्ण उपचार घेत आहेत.
सहाशेहून अधिक तरुणांना करोनाची लागण
शहरामध्ये सर्वाधिक तरुणांना करोनाची लागण झाली आहे. आजपर्यंत 645 तरुणांना करोनाची लागण झाली आहे. याचे प्रमाण एकूण रुग्णांच्या 41 टक्के आहे. याखालोखाल 40 ते 59 वर्ष वय असलेल्या 399 प्रौढ व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे. त्यांचे प्रमाण 25 टक्के इतके आहे. उर्वरित रुग्ण हे लहान व किशोरवयीन मुले तसेच ज्येष्ठ नागरिक आहेत.