पुणे – कोजागरी पौर्णिमा आणि दूध हे समीकरणच आहे. मात्र, यंदा कोजागरी पौर्णिमेदिवशीच चंद्रग्रहण आले आहे. त्याचा दूधविक्रीवर परिणाम झाला आहे. गणेश पेठ येथील दूध बाजारात शनिवारी (दि.28) सकाळपासूनच ग्राहकांचा अभाव असल्याने दुधाचे भाव स्थिर राहिले.
एक लिटर दुधाला 70 ते 75 रुपये भाव मिळाल्याची माहिती गणेश पेठ दूध बाजार खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दामोदर हिंगमिरे यांनी दिली. ते म्हणाले, “दरवर्षी कोजागरी पोर्णिमेला शहर आणि उपनगरांतून मोठ्या प्रमाणात आवक होते. मात्र, यंदा कोजागरीच्या दिवशी चंद्रग्रहण आल्याने कोजागरी साजरी करणे अनेकांनी टाळले आहे. चंद्रग्रहणामुळे दूध विक्रेत्यांसह व्यापाऱ्यांचीही निराशा झाली.
गणेश पेठेतील दूध बाजारात शुक्रवारी अडीच हजार लिटरची आवक झाली. 18 लिटरच्या घागरीला 1,300 रुपये भाव मिळाला. मुंढवा, अरणेश्वर, कात्रज, वेल्हा, केसनंद, वाघोली येथून दुधाची आवक झाली. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी कोजागरी साजरी केली. त्यामुळे दुधाची आवकही मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे भावातही वाढ झाली होती. प्रति लिटरला 75 ते 80 रुपये भाव मिळाला होता, असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.