पुणे – पुणे-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-पुणे मार्गावर दिवाळीच्या मुहुर्तावर दि. 5 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान विशेष ट्रेन धावणार आहे. यामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी आरक्षण दि. 29 ऑक्टोबरपासून करता येणार आहे.
कोल्हापूर-पुणे-मुंबई मार्गावर पूर्वी “सह्याद्री’ एक्स्प्रेस धावायची. करोना काळात ती बंद करण्यात आली. आता पुन्हा ही ट्रेन सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. खासदारांच्या उपस्थितीत रेल्वेच्या बैठकीतही धनंजय महाडिक यांनीही याबाबत प्रश्न उपस्थित करत रेल्वे सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने ही ट्रेन सुरू करण्याचे आश्वासन दिले. आता ही ट्रेन तूर्त पुण्यापर्यंत धावणार आहे. ही ट्रेन 20 स्थानकांवर थांबणार आहे. या ट्रेनला 16 कोच असतील. दि. 31 डिसेंबरपर्यंत या ट्रेनच्या 114 फेऱ्या होणार आहेत.
हे असतील थांबे
कोल्हापूर, वळिवडे, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज जंक्शन, सांगली, भिलावडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर, तारगाव, रहिमतपूर, कोरेगाव, सातारा, वाठार, लोणंद, निरा, जेजुरी आणि सासवड रोड पुणे असे रेल्वे गाडीला थांबे आहेत, असे प्रशासनाने सांगितले.
असे आहे वेळापत्रक
पुणे-कोल्हापूर (01023) ट्रेन रात्री 9.45 वाजता सुटेल. ती कोल्हापूर येथे पहाटे 5.40 वाजता पोहचेल.
कोल्हापूर-पुणे (01024) ट्रेन रात्री 11.30 वाजता सुटेल. ती पुण्यात सकाळी 7.45 वाजता पोहचेल.