लंडन :- इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने कसोटी क्रिकेटला पुन्हा एकदा अलविदा केला आहे. ऍशेस मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 49 धावांनी पराभव केला. या विजयानंतर अलीने हा निर्णय जाहीर केला.
याआधी त्याने 2021 साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, यंदाच्या ऍशेस मालिकेत त्याने निर्णय मागे घेत इंग्लंड संघात पुनरागमन केले होते.
मोईन अली इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सच्या विनंतीवरून निर्णय फिरवून कसोटी संघात परतला होता. मात्र, आता स्टोक्ससह अन्य कोणीही विनंती केली तरीही निवृत्तीचा निर्णय फिरवणार नाही, असे त्याने सांगितले आहे. या सामन्यात इंग्लंडच्या दोन क्रिकेटपटूंनी निवृत्तीचा निर्णय घेतला. मोईन अलीपूर्वी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनेही निवृत्ती जाहीर केली होती.
मोईनने या मालिकेत चार सामने खेळले त्यात त्याने नऊ बळी घेतले. अखेरच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात तीन महत्त्वपूर्ण बळी घेत इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या मालिकेत मोईनने चार सामन्यांत एकूण 180 धावा केल्या. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
मोईनने 68 कसोटी सामने खेळताना 3094 धावा केल्या आहेत. त्यात 5 शतके आणि 15 अर्धशतके आहेत. कसोटीत 3000 पेक्षा जास्त धावा आणि 200 पेक्षा जास्त बळी घेणारा तो जगातील 16 वा क्रिकेटपटू ठरला आहे. कसोटीतून निवृत्ती घेतली असली तरीही तो एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळत राहणार आहे.