IND vs ENG 5th Test, Kuldeep Yadav : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात कुलदीप यादवने धुमाकूळ घातला. धरमशालामध्ये त्याच्या फिरणाऱ्या चेंडूंसमोर इंग्लिश फलंदाज कोसळले. भारतीय संघाने इंग्लंडला पहिल्या डावात 218 धावांत गुंडाळलं.
कुलदीपने 15 षटकांत 72 धावा देत पाच विकेट्स घेतल्या. त्याने जॅक क्रॉली (79), बेन डकेट (27), ऑली पोप (11), जॉनी बेअरस्टो (29) आणि बेन स्टोक्स (0) यांना बाद केले. चार विकेट घेत कुलदीपने कसोटी क्रिकेटमध्ये 50 बळीही पूर्ण केले. यासह कुलदीप यादवने एक विक्रम नोंदवला आहे. सध्या त्याच्या नावावर 12 कसोटीत 51 विकेट आहेत. 40 धावांत पाच बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
या काळात कुलदीपने असे काही करून दाखवले जे 100 वर्षांत झाले नाही. खरे तर, गेल्या 100 वर्षात सर्वात कमी चेंडू टाकून 50 विकेट्स घेण्याच्या बाबतीत कुलदीप भारतीय गोलंदाजामध्ये अव्वलस्थानी पोहचला आहे. या बाबतीत त्याने अक्षर पटेलचा विक्रम मोडला. कुलदीपने कसोटीत 1871 चेंडू टाकून 50 बळी पूर्ण केले, तर अक्षरने यासाठी 2205 चेंडू टाकले होते. बुमराह 2520 चेंडूसह तिसऱ्या स्थानावर आहे.
तसेच तिन्ही फॉर्मेटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा भारताचा पाचवा गोलंदाज आहे. कुलदीपने कसोटी कारकिर्दीत खेळलेल्या 12 कसोटी सामन्यांमध्ये 50 बळी पूर्ण केले. भारतासाठी सर्वात जलद वेळेत 50 कसोटी बळी पूर्ण करणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो संयुक्त पाचवा ठरला आहे. भारतासाठी कसोटीत सर्वात वेगवान 50 विकेट्स पूर्ण करणारा आर अश्विनने अवघ्या 9 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. अनिल कुंबळेने 10 कसोटी सामन्यात 50 बळी घेतले आहेत. हरभजन सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी 11 कसोटी सामन्यांमध्ये 50 बळी पूर्ण केले आहेत.
IND vs ENG 5th Test : कुलदीपचा पंजा तर अश्विनचा चौकार, पहिल्या डावात इंग्लंड 218 धावांत गारद…
तसेच कसोटी क्रिकेटमध्ये किमान 50 बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये कुलदीपचा स्ट्राइक रेट हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम आहे. गोलंदाजांचा स्ट्राइक रेट म्हणजे ते सरासरी किती चेंडू टाकल्यानंतर विकेट घेतात हे होय. कुलदीपचा कसोटीतील स्ट्राईक रेट 36.8 आहे. त्याचबरोबर या बाबतीत इंग्लंडचा जॉर्ज लोहमन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचा स्ट्राईक रेट 34.1 होता. तिसऱ्या स्थानावर 37.7 च्या स्ट्राइक रेटसह जॉन फेरीस आणि चौथ्या स्थानावर माजी किवी वेगवान गोलंदाज शेन बॉन्ड 38.7 च्या स्ट्राइक रेटसह आहे.