BAN vs SL 1st Test : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सिल्हेट आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा (24 मार्च,रविवार) खेळ संपेपर्यंत बांगलादेशने केवळ 47 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी अजूनही 464 धावांची गरज होती. दरम्यान, 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेचा फलंदाज कामिंदू मेंडिसने असा विक्रम केला आहे, जो आजपर्यंत कोणालाही करता आलेला नाही.
श्रीलंकेच्या फलंदाजाने रचला इतिहास….
श्रीलंकेच्या संघाने पहिल्या डावात केवळ 57 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर कामिंडू मेंडिस ( Kamindu Mendis ) सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने पहिल्या डावात 102 धावा केल्या आणि धनंजय डी सिल्वासोबत ( Dhananjaya de Silva ) 202 धावांची भागीदारी केली.
Brilliant comeback to Test cricket for Kamindu Mendis, who smashes twin centuries (102 & 164) in Sylhet! 💯💯
These are the FIRST EVER twin tons by a batsman batting at No. 7 or lower in Test history.
A truly remarkable feat! #BANvSL pic.twitter.com/my6sQm7waG
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) March 24, 2024
दुसऱ्या डावात मेंडिसला आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले आणि यावेळी त्याने 164 धावांची खेळी केली. यासह कमिंडू मेंडिस हा कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे ज्याने 7 व्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा खालील क्रमांकावर फलंदाजी करताना दोन्ही डावात शतके झळकावली आहेत. याशिवाय मेंडिस आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या तीन डावात अर्धशतके झळकावणारा श्रीलंकेचा पहिला खेळाडू ठरला आहे. पदार्पणाच्या डावातही त्याने 61 धावा केल्या होत्या.
त्याच्याशिवाय धनंजय डी सिल्वानेही दोन्ही डावांत शतके झळकावली आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावणारी मेंडिस आणि डी सिल्वा ही तिसरी जोडी ठरली आहे. त्यांच्या आधी ग्रेग आणि इयान चॅपल यांनी 1974 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावली होती. 2014 मध्ये मिसबाह उल-हक आणि अझहर अली यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही डावात शतके झळकावण्याचा पराक्रम केला होता. मेंडिस आणि डी सिल्वा यांच्यात पहिल्या डावात 202 आणि दुसऱ्या डावात 173 धावांची भागीदारी झाली.
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्याची स्थिती…
पहिल्या डावात खेळताना श्रीलंकेने 280 धावा केल्या होत्या, तर बांगलादेश पहिल्या डावात केवळ 188 धावांवरच मर्यादित होता. कामिंडू मेंडिस आणि धनंजय डी सिल्वा यांची शतके आणि करुणारत्नेच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने दुसऱ्या डावात 418 धावा केल्या. आता बांगलादेशने त्यांच्या दुसऱ्या डावात 47 धावांत 5 विकेट गमावल्या असून त्यांना विजयासाठी 464 धावांची गरज आहे.