Matthew Wade has announced his retirement from red-ball cricket – ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने प्रथम श्रेणी आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मार्श शेफिल्ड शिल्डच्या अंतिम सामन्यापूर्वी त्याने ही घोषणा केली आहे.
त्याचा संघ टास्मानियाला साऊथ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे. हा सामना वेडचा अखेरचा प्रथम श्रेणी सामना असणार आहे. याच सामन्यामुळे वेड गुजरात टायटन्सच्या आयपीएलमधील पहिल्या दोन सामन्यांनाही मुकणार आहे. वेडने जरी कसोटीतून निवृत्ती घेतली असली, तरी तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळणे सुरू ठेवणार आहे. तसेच जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतही तो ऑस्ट्रेलिया संघात असण्याची दाट शक्यता आहे.
Matthew Wade announces retirement from the longest format 👀https://t.co/zhKtaTlmC2
— ICC (@ICC) March 15, 2024
वेडने नुकतेच न्यूझीलंडविरुद्ध गेल्या महिन्यात झालेल्या टी-20 मालिकेत मिचेल मार्शच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व केले होते. वेडने 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाला टी-20 विश्वकरंडक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. वेडने ऑस्ट्रेलियाकडून 36 कसोटी सामनेही खेळले आहेत. मात्र त्याला कसोटी संघात त्याचे स्थान पक्के करण्यात अपयश आले होते. त्याने 2012 ते 2021 दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून खेळलेल्या 36 कसोटीत 4 शतके आणि 5 अर्धशतकांसह 1613 धावा केल्या आहेत.
Ranji Trophy 2024 : चॅम्पियन मुंबईवर पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
वेड देशांतर्गत क्रिकेटमध्ये टास्मानिया व व्हिक्टोरिया संघाकडूनही खेळला आहे. त्याला व्हिक्टोरिया संघाकडून खेळताना कर्णधार आणि खेळाडू म्हणून मोठे यश मिळाले. त्याने व्हिक्टोरिया संघाकडून 4 वेळा मार्श शेफिल्ड शिल्ड स्पर्धा जिंकली. यातील दोन विजेतेपदे त्याने कर्णधार म्हणूनही जिंकली आहेत.
वेडने त्याच्या कारकिर्दात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 165 सामने खेळले असून 9183 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 19 शतकांचा आणि 54 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच यष्टीरक्षक करताना 463 बळीही मिळवले आहेत.