भाजप म्हणतो, सीबीआयपासून वाचण्याची धडपड
कोलकता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मात्र, मोदींची अपॉईंटमेंट मागितल्यावरून भाजपने ममतांची खिल्ली उडवली आहे. ममता सीबीआयपासून वाचण्याची धडपड करत आहेत, असे त्या पक्षाने म्हटले आहे.
ममतांच्या कार्यालयातून मागील आठवड्यात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर बुधवारी ममता आणि मोदींची भेट होणार असल्याची माहिती बंगाल सरकारच्या सुत्रांनी दिली. बंगालशी संबंधित प्रशासकीय मुद्द्यांवरून ती भेट होणार असल्याचे समजते. मात्र, त्या प्रस्तावित भेटीवरून बंगालमधील राजकारण तापले आहे.
मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीका करण्यात ममता नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत. त्यामुळे ममतांकडून मोदींच्या भेटीसाठी होणारे प्रयत्न पश्चिम बंगाल भाजपला रूचलेले नाहीत. त्यातून तेथील नेत्यांनी ममतांवर टीकास्त्र सोडले आहे. स्वत:ला आणि स्वत:च्या पक्षातील (तृणमूल कॉंग्रेस) नेत्यांना सीबीआयने हात लावू नये अशी याचना करण्यासाठीच त्या दिल्लीला जात असाव्यात, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे. चिट फंड घोटाळ्यावरून तृणमूलचे काही नेते सीबीआयच्या रडारवर आहेत.