माण-खटावमध्ये महिला मेळाव्यानिमित्त भगवे वादळ

शेखर गोरेंमुळे महिलांना मिळाले व्यासपीठ, जिल्ह्यातील ऐतिहासिक महिला मेळावा

गोंदवले  – युवा नेते शेखर गोरे यांनी माण-खटाव मतदारसंघातील माता – भगिंनीसाठी “होममिनिस्टर खेळ पैठणी’चा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठ मिळवून देत आयोजित केलेला मेळावा हा जिल्ह्यातला सर्वांत मोठा ऐतिहासिक महिला मेळावा ठरला. या मेळाव्याला महिलांनी दिलेल्या उत्सफूर्त प्रतिसादामुळे दहिवडी शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. गर्दीमुळे मेळाव्याचे प्रमुख पाहुणे राज्याचे भावजी होममिनिस्टर फेम आदेश बांदेकरही अडकून पडले होते. व्यासपीठ गाठण्यासाठी त्यांना दोस तास लागले. शेखरभाऊ गोरेंच्या पाठीशी सर्वांनी रहा व त्यांना विधानभवनात पाठवा असे आवाहन करुन आदेश बांदेकर यांनी खेळ पैठणीचा कार्यक्रम सुरू केला.

यावेळी उपस्थित महिलांमधून कुपन काढून 200 महिलांना व्यासपीठावर बोलावून त्यांच्याबरोबर विविध खेळ मांडून मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पाडला. या महिला मेळाव्यात 20 हजार महिलांच्या उपस्थितीचे नियोजन करण्यात आले होते मात्र, 35 हजारांहून अधिक माताभगिनींनी उपस्थिती दर्शविली.

महिला मेळाव्याचे दीपप्रज्वलन सौ. सोनलताई गोरे, सौ. सुरेखाताई पखाले यांच्या हस्ते करण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ना. आदेश बांदेकर यांनी पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर भावजींचे औक्षण सौ. सोनलताई गोरे व सुरेखाताई पखाले यांनी केले. यावेळी शेखरभाऊ गोरे, शिवसेनेचे माण तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी, रामभाऊ जगदाळे, खटावचे तालुकाप्रमुख युवराज पाटील आदी शिवसैनिक व मान्यवर उपस्थित होते.

“खेळ मांडियेला’ या स्पर्धेत उपस्थित सर्व महिलांना एक मौल्यवान भेटवस्तू देण्याबरोबरच पाणी व खाऊ देण्यात आले तर उपस्थित महिलांमधून पाच क्रमांक काढण्यात आले. त्यात पहिल्या क्रमांकाचे बक्षीस सौ. ज्योती दीपक काशिद (दहिवडी) यांनी वॉशिंग मशीन व मानाची पैठणी मिळवली. दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस सौ. गायत्री गणेश तिवाटणे यांना एलईडी टिव्ही व मानाची पैठणी मिळाली.

तिसरा क्रमांक सौ. वंदना पांडुरंग ओतारी यांना फ्रीज व मानाची पैठणी मिळाली. चौथ्या क्रमांकाचे बक्षीस सौ. वर्षा विश्‍वास इंदलकर यांना पिठाची चक्की व मानाची पैठणी मिळाली तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस सौ. कविता अजित जाधव पिंगळी यांना वॉटर प्युरीफायर व मानाची पैठणी देण्यात आले. याबरोबरच स्पर्धेतून बाहेर पडलेल्या सर्व स्पर्धकांना आदेश बांदेकर यांच्याहस्ते इतर आकर्षक बक्षीसे देण्यात आली. सूत्रसंचालन राजेंद्र जगदाळे व ज्ञानेश्‍वरी पाटील यांनी केले. सर्व उपस्थित महिलांचे आभार सौ. सोनलताई गोरे यांनी मानले.

माता-भगिनींना घरपोहोच भेट देणार

महिला मेळाव्यात 20 हजार माताभगिनींचे नियोजन केले होते मात्र सर्वांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिल्याने त्यात किमान 15 हजारांहून अधिक महिलांची संख्या वाढल्याने नियोजनात थोडा बदल करावा लागला. त्यामुळे सर्व उपस्थित महिलांची व्यवस्थित सोय करू शकलो नाही. तसेच या मुलाची, भावाची भेट देऊ शकलो नाही. त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. मात्र ती भेट सर्वांना घरपोहोच दिली जाणार आहे. आपण सर्वजण विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, अशीच साथ विधानसभा निवडणुकीत देऊन एक संधी द्या आपले उपकार कधीच विसरणार नाही.
शेखरभाऊ गोरे, युवानेते

Leave A Reply

Your email address will not be published.