राहुल गांधींची आपल्या जुन्या आसनालाच पसंती
नवी दिल्ली: लोकसभेतील सदस्यांना दर पाच वर्षांनी ठराविक आसन व्यवस्था दिली जाते. आता पुन्हा एकदा लोकसभेतील सदस्यांना नवी आसन व्यवस्था दिली गेली आहे. या नव्या आसन व्यवस्थेनुसार पहिल्या रांगेतील पहिल्या आसनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बसणार असून त्यांच्या शेजारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बसणार आहेत. तर, तिसऱ्या क्रमांकावर गृहमंत्री अमित शहा बसणार आहेत.
तसेच स्मृति इराणी यांना लोकसभेतील आसन व्यवस्थेमधील पहिल्या रांगेत बसण्याची जागा मिळाली आहे. त्याचबरोबर परिवहन मंत्री नितिन गडकरी, ग्राम विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर, एचडी सदानंद गौडा यांना सुद्धा पहिल्या रांगेत जागा मिळाली आहे. कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना सुद्धा पहिल्या रांगेत आसन व्यवस्था देण्यात आली आहे.
तर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आसन व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. राहुल गांधी हे पुन्हा दुसऱ्या रांगेत बसणार आहेत. मात्र, त्यांना नव्या आसन व्यवस्थेनुसार 466 वा क्रमांक मिळाला आहे. समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांना 455 वा क्रमांक, कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना 457 क्रमांकाचा आसन क्रमांक मिळाला आहे.
लोकसभेतील प्रतिष्ठित पहिल्या रांगेतील आसन व्यवस्थेत सर्वात मोठा फेरबदल केल्याचे पहायला मिळत आहे. कारण, सहा वरिष्ठ खासदार जे पहिल्या रांगेतील सदस्य होते ते संसदेत पुन्हा आले नाहीत. यामध्ये माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी या नेत्यांचा समावेश आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत यापैकी कुणी निवडणूक लढवली नाही तर कुणी निवडणूक पराभूत झाले आहेत.