पृथ्वी पुन्हा उभारी घेईल – पिंगुटकर

मुंबई – पृथ्वी शॉ हा अतिशय जिगरबाज खेळाडू आहे. त्याने हेतूपूर्वक कोणतेही उत्तेजक घेतलेले नाही. त्यामुळेच तो बंदीचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा चमकदार कामगिरी करील असा आत्मविश्‍वास पृथ्वीला क्रिकेटचे बाळकडू देणारे प्रशिक्षक संतोष पिंगुटकर यांनी व्यक्‍त केला.

उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पृथ्वीला कोणत्याही स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये आठ महिन्यांकरिता बंदी घालण्यात आली आहे. बंदीचा कालावधी दिनांक 16 मार्च ते 15 नोव्हेंबर असा राहणार आहे.
पिंगुटकर यांनी सांगितले की, पृथ्वीसाठी हा मोठा धक्का आहे. त्याने खोकल्यावरील उपचारासाठी घेतलेले औषध उत्तेजकाच्या यादीतील औषध निघावे का निव्वळ योगायोग आहे. त्यामागे कोणताही अन्य हेतू नव्हता.

नकळतच त्याच्याकडून ही चूक झाली आहे. त्यापासून तो बोध घेईलच. पण बंदीचा कालावधी संपल्यानंतर तो भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवील अशी मला खात्री आहे. आतापर्यंत त्याने जे यश मिळविले आहे, त्यासाठी त्याने खूप मेहनत केली आहे.

पृथ्वीने सांगितले की, माझ्याकडून ही नकळत चूक झाली आहे. हा माझ्यासाठी आश्‍चर्याचा धक्का आहे. मी सध्या दुखापतीवर उपचार घेत आहे. याच काळात माझ्याबाबत असे घडावे ही निश्‍चितच क्‍लेषदायकच गोष्ट आहे. मात्र, त्यामुळे मी डगमगणार नाही. क्रिकेट हेच माझे जीवन आहे. भारतीय संघाला किंवा आमच्या मुंबई संघास काळिमा फासली जाईल, असे कोणतेही गैरकृत्य माझ्याकडून घडणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.