नवी दिल्ली -कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी उद्योगपती नवीन जिंदल यांच्या भाजप प्रवेशावरून त्यांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदींना कॉंग्रेसमुक्त भारत हवा होता. प्रत्यक्षात त्यांनी कॉंग्रेसला भ्रष्टाचारीमुक्त बनवलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कॉंग्रेसचे माजी खासदार असणाऱ्या जिंदल यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांची हरियाणातील कुरूक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यावर रमेश यांनी सोशल मीडियावरून भाष्य केले.
मोठ्या आकाराच्या वॉशिंग मशीनची गरज भासल्यावर तसे घडणारच होते. मागील दहा वर्षांत कॉंग्रेससाठी शून्य योगदान दिल्यावर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हणणे मोठा विनोद आहे, असे त्यांनी जिंदल यांना उद्देशून म्हटले.
कॉंग्रेसमधील भ्रष्ट नेत्यांना भाजपकडे धाव घेण्यासाठी भाग पाडण्याच्या उद्देशातून ईडी, सीबीआयबरोबरच अनेक वॉशिंग मशीन तैनात केल्या आहेत, अशी उपरोधिक टिप्पणीही रमेश यांनी केली. काही प्रकरणांवरून जिंदल ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर होते. त्याचा संदर्भ रमेश यांनी घेतला.