नवी दिल्ली – कर्नाटकचे माजी मंत्री आणि खाण उद्योजक जी. जनार्दन रेड्डी यांनी आज लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. बेकायदेशीर खाण प्रकरणातील आरोपी असलेले रेड्डी हे गंगावतीचे आमदार आहेत. गेल्या वर्षी राज्य विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी स्वत:चा कल्याण राज्य प्रगती पक्ष नावाचा स्थापन केला होता आणि त्यांनी भाजपसोबतचे त्यांचे दोन दशके जुने असलेले संबंध तोडले होते.
रेड्डी यांनी आज त्यांच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनकरण केले. माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र आणि इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत ते भाजप मध्ये सामील झाले. रेड्डी यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. तथापि, २७ फेब्रुवारीच्या राज्यसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला होता.
रेड्डी म्हणाले की, अमित शाह यांनी मला दिल्लीत आमंत्रित केले होते आणि त्यांनी मला भाजप मध्ये पक्ष विलिन करण्याचे निमंत्रण दिले होते. ते मी आनंदाने स्वीकारले. ते म्हणाले की, मी विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. मी कोणत्याही अटी किंवा अपेक्षा घेऊन आलो नाही.
पक्ष मला कोणतीही जबाबदारी देईल ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन. भाजप नेहमीच माझ्या रक्तात आहे, पण काही कारणास्तव मी बाहेर गेलो होतो, पण आज मला आईच्या कुशीत परत आल्यासारखे वाटते अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.