नवी दिल्ली – मॉस्को दहशतवादी हल्ला प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघा संशयितांना आज रशियाच्या दहशतवाद विरोधी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. तेथे त्यांच्यावर दहशतवादी कृत्याचे आरोप ठेवण्यात आले. या चारही जणांना पोलीस कोठडीमध्ये बेदम मारहाण करण्यात आल्याचे दिसत होते. चौघांपैकी एक जण तर न्यायालयात आणल्यावर सुनावणीदरम्यान जेमतेम शुद्धीवर होता.
या चौघांपैकी दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आहे, असे न्यायालयाच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. मात्र या आरोपींची न्यायालयातील स्थिती पाहता त्यांना मुक्तपणे आपली बाजू मांडणे शक्य झाले असण्याबद्दल शंका उपस्थित होते आहे. या चौघांपैकी तिघांनी आपला गुन्हा कबूल केला असल्याचे वृत्त रशियातील माध्यमांकडून प्रसिद्ध होते आहे. मात्र या वृत्ताच्या सत्यतेबाबत साशंकता आहे.
गेल्या आठवड्यात मॉस्कोतील क्रोकस सिटी सभागृहात झालेल्या संगीताच्या कार्यक्रमामादरम्यान झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १३७ जण ठार झाले होते. या प्रकरणी अटक केलेले चौघेही १९ ते ३२ वर्षे वयोगटातील आहेत. या चौघांवर दहशतवादी कृत्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या आरोपात दोषी आढळल्यास या आरोपींंना आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते. हे चौघेही ताजिकीस्तानचे नागरिक आहेत. या हल्ल्याचा तपास आणि खटल्याचे कामकाज २२ मे पर्यंत सुरू राहणार आहे. या चौघानाही तोपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चौघांवर आरोप ठेवले गेल्यानंतर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे न्यायालयाच्या अधिकार् यांकडून सांगण्यात आले.
या भीषण दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांना आदरांजली म्हणून रशियामध्ये एक दिवसाचा दुखवटा पाळण्त आला होता. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खोरसान या संघटनेने स्वीकारली आहे.
या हल्ल्याप्रकरणी आणखीन ७ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यामागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी शनिवारी रात्री देशवासियांना उद्देशून केलेल्या संबोधनामध्ये केला होता. ताब्यात घेतलेले हे सर्व ७ जण रशियातून युक्रेनला पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडले गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या हल्ल्याशी आपला काहीही संबंध असल्याचा आरोप युक्रेनने फेटाळून लावला आहे.
बेदम मारहाण झाल्याच्या खुणा
या चौघांनाही कोठडीत चौकशीदरम्यान बेदम मारहाण झाल्याचे रशियातील माध्यमांनी म्हटले आहे. चौघांपैकी तिघांचे चेहरे सूजलेले दिसत होते. एकाच्या कानाला पट्टी बांधली होती. चौथ्या आरोपीला रुग्णालयातून थेट न्यायालयात व्हिलचेअरवरून आणण्यात आले होते. संपूर्ण सुनावणी सुरू असेपर्यंत तो डोळे बंद करूनच बसून राहिला होता.