विरोधकांच्या आक्षेपावर नाना पटोले यांचा पलटवार
मुंबई – शस्त्रक्रियेमुळे सध्या विश्रांती घेत असलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विरोधकांनी टीका सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांना विधीमंडळात उपस्थित राहणे जमत नसेल तर त्यांनी आपल्याकडील मुख्यमंत्री पदाचा कारभार दुसऱ्याकडे सोपवावा अशी सुचना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
त्यावर जोरदार पलटवार करताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे की काही किरकोळ अपवाद वगळता पंतप्रधान मोदीही संसदेत हजर राहात नाहीत. जर त्यांनाही संसदेत हजर राहणे जमत नसेल तर त्यांच्याही पदाचा चार्ज त्यांनी दुसऱ्याकडे द्यायला हवा. ते आज पत्रकारांशी बोलत होते.
पटोले म्हणाले की आमची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, त्यांची प्रकृती चांगली असून ते अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. विरोधक मात्र त्या विषयावरून विनाकारण राजकारण करीत आहेत. वास्तविक पंतप्रधान मोदी सुद्धा संसदेत उपस्थित राहात नाहीत असा आक्षेप आहे. त्याविषयीही विरोधकांनी माहिती घ्यावी आणि मग बोलावे.
अन्यथा मोदींचाही चार्ज त्यांनी दुसऱ्या नेत्याकडे सोपवावा असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला. नोकर भरतीचे पेपर फुटल्याच्या प्रकरणात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की या विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा झाली पाहिजे. याशिवाय या प्रकरणाची तार कुठपर्यंत जोडली गेली आहे हे लोकांच्या लक्षात येणार नाही.