नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूर सरकारशी फोन वरून संपर्क साधला आणि त्यांना सर्व आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी सर्व मदत देण्याची ग्वाही दिली आहे. गुरुवारी त्यांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लूंग यांच्याशी फोनवरून चर्चा केली त्यावेळी त्यांनी त्यांना हे आश्वासन दिले.
करोनामुळे निर्माण झालेले आर्थिक आव्हान आणि अन्य आरोग्य विषयक बाबींविषयीही त्यांनी यावेळी चर्चा केली. करोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपापल्या देशात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयीही त्यांनी चर्चा केली.
करोनामुळे निर्माण झालेल्या विविध क्षेत्रातील आव्हानांविषयी एकमेकांशी अधिक सहकार्याने काम करण्यास दोन्ही नेत्यांनी संमती दर्शवली आहे. दोन्ही देशांतील स्ट्रॅटेजीक पार्टनरशिपमुळे या क्षेत्रातील स्थैर्य आणि समृद्धीला गती देता येईल, असा विश्वास मोदींनी ट्विटरवर व्यक्त केला आहे.