मुंबई: भाजपच्या कोविड हेल्पलाईनचा शुभारंभ विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. माजी मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान सागर बंगला येथे मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये करोना संकटाचा सामना करणा-यांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या मलबार हिल क्षेत्राशी निगडीत या कोविड हेल्पलाईनप्रमाणेच मुंबईच्या सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपा कोविड हेल्पलाईन सुरू करणार आहे.
या हेल्पलाईनमुळे नागरिकांना करोना संकटाच्या या गंभीर परिस्थितीमध्ये मदत मिळणार आहे. महापालिकेद्वारे अधिकृत केलेले कोव्हिड डॉक्टर, क्वारंटाईन सेंटर्स, आरक्षित रुग्णालये, बिगर कोविड रुग्णालय, सामान्य क्लिनिक, पोलीस स्थानक, रेशन दुकान, मंत्रालय नियंत्रण कक्ष, वार्ड कंट्रोल रूम, आरोग्य अधिकारी व रुग्णवाहिकेशी संबंधित मदत, सुविधा व सेवांच्या संदर्भात आवश्यक माहिती घेता येऊ शकणार आहे.
फडणवीस म्हणाले, करोना संकटाच्या काळात ही अतिशय उपयोगी हेल्पलाईन ठरेल. त्याद्वारे सामान्य व्यक्तींना करोना संकटामध्ये आपल्या आवश्यक सुविधा प्राप्त करण्यासाठी सहजपणे संपर्क करता येईल. अशा प्रकारची हेल्पलाईन मुंबईतील प्रत्येक भागासाठी बनवली जावी. ज्यामुळे सामान्य जनतेला आपल्या गरजेच्या वेळी संपर्क करताना कोणतीही अडचण येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
मलबार हिलशी संबंधित हेल्पलाईन क्रमांक 7021584358 आणि 8879774368 वर स्थानिक लोक आपल्या भागातील करोना संकटाच्या परिस्थितीमध्ये सहाय्य, सुविधा व सेवा प्राप्त करू शकतात.