बांकुरा (पश्चिम बंगाल) – मोबाईल टॉवर चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आणि पश्चिम बंगाल आणि बिहारमधील सात जणांना अटक केली. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील बरजोडा येथे 40 फूट उंच मोबाइल टॉवर बेपत्ता झाला होता, त्यानंतर तो स्थापित करणाऱ्या कंपनीने एफआयआर दाखल केला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी टॉवर उभारलेल्या जमिनीच्या मालकाला अटक केली. त्याच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील एक आणि बांकुरा येथील दुर्लभपूर येथील तीन जणांना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हावडा जिल्ह्यातील चटरजेहाट येथून आणखी एका व्यक्तीला आणि हुगळी जिल्ह्यातील लिलुआ येथून एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून चोरीच्या टॉवरचा काही भाग जप्त करण्यात आला आहे.
चोरीचा माल ज्या वाहनातून नेला होता तेही पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी एफआयआर नोंदवून पुढील तपास सुरू असून या टोळीने अन्य ठिकाणीही असे गुन्हे केले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. या चोरीची पाळेमुळे आंध्र प्रदेश, तेलंगण आणि महाराष्ट्रापर्यंत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.