पुणे – पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आता धमक्या आणि गुंडगिरीचा शिरकाव झाला असून मनसेच्यापुणे पदवीधरच्या उमेदवार रूपाली पाटील यांना सातारा जिल्ह्यातून एका तरुणाने फोन करून “जिथे असशील तिथे संपवून टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस’ अशी धमकी दिल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी तपास करून धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. यासंदर्भात एक तक्रार अर्ज त्यांनी खडक पोलिस ठाण्यात दिला आहे.
राज्यभरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमधून उमेदवार निवडून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या निवडणुकीमध्ये रंग भरण्यास सुरुवात झाली असून उमेदवारांचा प्रचारही सुरू झालेला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन पदवीधरांच्या भेटीगाठी घेणे, प्रचार करणे अशी कामे करीत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अध्यक्षा रूपाली पाटील या मनसेकडून पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी नुकताच सातारा जिल्ह्याचा दौरा केलेला आहे.
शनिवारी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून अज्ञात नंबरवरून फोन आला. ‘मी सातारा जिल्ह्यातून लबाडे बोलत असून, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस. अन्यथा पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू.’ अशी धमकी दिली. पाटील यांचा फोन त्यांच्या सहकारी महिलेकडे होता. दरम्यान त्यांनी तक्रार अर्जात पोलिस संरक्षण मिळण्याची मागणी केली आहे.
रुपाली पाटील यांच्या सहायक महिलेकडे त्यांचा मोबाईल असताना धमकीचा कॉल आला होता. त्यानूसार अज्ञात व्यक्तीविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे– भरत जाधव (वरिष्ठ पोलिस निरीक्षक)