पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाढवा मेळाव्यात मशिदींसमोरील भोंग्याच्या समोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत. या आदेशावरून पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले वाद चव्हाट्यावर आले आहेत. या आदेशानंतर प्रभागात बहुतांश मुस्लीम मतदार असल्याने मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आपण प्रभागात शांतता ठेवण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले होते. नाराज असलेले मोरे राष्ट्रवादीत जाणार असल्याची जोरदार चर्चाही शहरातील राजकीय वर्तुळात चालू होती असे असताना मोरे मनसेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून लेफ्ट झाले आहेत.
राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर पुण्यातील मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत पक्षाचा राजीनामा दिला होता. याशिवाय ठाकरे यांच्या या नवीन भूमिकेमुळे मनसेचे राज्यभरातील मुस्लिम पदाधिकारी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे यांना सुद्धा ठाकरे यांनी केलेल्या वक्यव्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.
वसंत मोरे यांच्यावर पक्षातील काही पदाधिकारी सुद्धा नाराज आहेत शिवाय यांच्यामध्ये मतभेद असल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे. या मतभेदामुळे मोरे यांनी उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख या ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षबांधणीसाठी बनवलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मतभेद दिसून येत असल्याने तसेच चर्चा टाळण्यासाठी मोरे यांनी ग्रुप सोडल्याचे सांगण्यात येत आहे.