मुंबई – नौदलाची बंद पडलेली ऐतिहासिक युद्ध नौका आयएनएस विक्रांत ही भंगारात काढण्याऐवजी ती जतन करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जनतेकडून मोठ्या प्रमाणात निधी जमवला. लोकांनीही हा भावनिक विषय असल्याने त्यांना भरभरून पैसे दिले, पण या पैशाचे नंतर काय झाले असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. किरीट सोमय्यांकडून आम्हाला एक रुपयाही पाठवण्यात आलेला नाही, असा खुलासा माहितीच्या अधिकारात झाला आहे; मग हे पैसे गेले कोठे, असा प्रश्न उपस्थित करून संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांची आणखी एक फाइल उघडली आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी अत्यंत रोखठोक शैलीत किरीट सोमय्या यांच्यावर हा घणाघात केला.
राऊत यांनी फेसबुक पोस्ट द्वारे म्हंटल की,’Mark My Words INS विक्रांत च्या नावे 56 कोटी गोळा करून जनतेला देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप बेट्यानां जेल मध्ये जावेच लागेल. किरीट सोमय्या हा महाराष्ट्र द्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे. लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या BJP ला जाब विचारावाच लागेल.’असा टोला लगावलाय.
हाच सोमय्यांविषयीचा पुरावा…
किरीट सोमय्या यांनी या कामासाठी लोकांकडे पैशाचे डबे फिरवून 57 ते 58 कोटी रुपये जमवले. हा पैसा राजभवनाकडे जमा केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. राजभवनाने किरीट सोमय्या यांच्याकडून एक रुपयाही जमा झाला नसल्याचे लेखी उत्तर दिले आहे. हाच सोमय्या यांच्या विरोधातील पुरावा आहे.