लोणंद – तरडगाव (ता. फलटण) येथील 27 वर्षीय महिलेची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर या महिलेच्या संपर्कातील 61 व्यक्तींची तपासणी होणार आहे. यामुळे फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचे गाव असणाऱ्या तरडगावसह फलटण तालुक्यात एकच खळबळ असून तरडगाव परिसर सील करण्यात आला आहे.
या महिलेची यापूर्वीची पहिली चाचणी निगेटिव्ह आली होती. पुणेस्थित या महिलेचा सहकारी पॉझिटिव्ह झाल्यामुळे तिने स्वतःहून क्वारंटाइन होऊन तपासणी केली होती. बुधवारी तिची दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या अनुषंगाने या महिलेला पुढील उपचारांसाठी सातारच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचे गाव तरडगाव आहे. तरडगांव परिसर तीन किलोमीटरपर्यंत सील करण्यात आला आहे.
जिल्ह्यात करोनाने शिरकाव केलेला असतानासुद्धा फलटण तालुक्यात शिरकाव झाला नव्हता, हे तालुक्यातील प्रशासन, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेचे मोठे प्रयत्न होते. मात्र, आता तरडगाव येथे करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली आहे. प्रशासनाने ताबडतोब येथे धाव घेऊन पुढील उपाययोजना सुरु केल्या आहेत. या महिलेच्या घरातील व्यक्तींसह 61 जणांना क्वारंटाइन करुन तपासणी सुरु केली आहे.