पुणे – ससून रुग्णालयात दाखल झालेल्या करोना बाधित रुग्णाचा 15 व्या दिवशी दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. त्याची प्रकृती व्यवस्थित झाल्यामुळे त्याला गुरुवारी घरी सोडण्यात आले. त्यामुळे रूग्ण वेळेत दाखल झाला, तर त्याच्यावर तत्काळ उपचारकरून तो बरा होऊ शकतो. हे ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सने दाखवून दिले आहे.
ससून रुग्णालयातील हा पहिला रूग्ण बरा झाला आहे. मागील पंधरा दिवसांपासून शहरात करोना बाधित मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढत आहे. अक्षरशः मृत्यूने कहर माजविला आहे. विशेषतः मृतांच्या एकूण संख्येत ससून रुग्णालयात सर्वाधिक मृत्यूची नोंद झालेली आहे. मात्र, रूग्ण शेवटच्या क्षणाला म्हणजेच खूप त्रास झाल्यावर ससून रूग्णालयात दाखल होत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, गुरुवारी (दि.16) पर्वती येथे राहणाऱ्या 42 वर्षीय व्यक्तीला घरी सोडण्यात आले. सर्दी, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना 31 मार्चला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची करोना तपासणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली. मागील 14 दिवस आयसीएमआरच्या सूचनेनुसार ससूनमधील डॉक्टर आणि परिचारिका यांनी रुग्णाला औषधोपचार करत, त्याची दिवस-रात्र काळजी घेत त्याला बरे केले. 14 आणि 15 व्या दिवशी त्याचे नमुने तपासले असता निगेटिव्ह आले, अशी माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.