पुणे – एआयटी आर्ट, डिजाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे सहाव्या दीक्षांत समारंभाचे शुक्रवारी (दि.13) सायंकाळी 4.30 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत तर डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अध्यक्षतेखाली तत्वज्ञ संत ज्ञानेश्वर विश्वशांती डोम, लोणी काळभोर येथे होणार आहे.
या निमित्ताने विद्यापीठातर्फे “इस्त्रो’चे माजी अध्यक्ष डॉ. ए. एस. किरण कुमार यांना विज्ञान व तंत्रज्ञानातील योगदानाबद्दल भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाने 2015 मध्ये स्थापना झाल्यापासून केलेला प्रवास उल्लेखनीय आहे.
विद्यापीठाने परीक्षेसाठी संपूर्ण डिजिटल प्रणाली अवलंबली असून त्यामुळे निर्विघ्न परीक्षेची अंमलबजावणी, वेळेत अचूक निकाल व सर्व प्रक्रियेतील पारदर्शकता ही एमआयटी एडीटीची आता ओळख बनली आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी दिली. यावेळी परीक्षा विभागप्रमुख डॉ. ज्ञानदेव निलवर्ण, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. विरेंद्र शेटे उपस्थित होते.
यंदाच्या दीक्षान्त समारंभात 23 पीएचडी, 51 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांसह एकूण 2805 विद्यार्थ्यांना एमआयटी एडीटीतर्फे पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नितीन गडकरी व डॉ. ए. एस. किरण कुमार विद्यापीठात येणार असल्याने विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. – प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू, एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे