नगर – गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक सरकारी रुग्णालयाची व्यवस्था कोलमडली आहे. अनेक जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा नाही, डॉक्टर्स, स्टाफची कमतरता असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी केली असता, अनेक त्रुटी आढळून आल्या. त्याचा आम्ही निषेध करतो.जिल्हा रुग्णालयच ऑक्सिजनवर आहे. शासनाने रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा करावी,अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याची इशारा शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिला.
शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने जिल्हा रुग्णालय येथे पाहणी करुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांच्याशी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, उपजिल्हाप्रमुख गिरिश जाधव, नगरसेवक दत्ता कावरे, योगीराज गाडे, संतोष गेनप्पा, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, सचिन शिंदे, रवि वाकळे, अशोक दहिफळे उपस्थित होते.