पुणे – राज्य आणि जिल्ह्याने आता 45 वर्षे वयापुढील नागरिकांच्या लसीकरणासाठी कंबर कसली असून, या चौथ्या टप्प्यात राज्यातील 2 कोटी 97 लाख लाभार्थींना लस दिली जाणार आहे, त्यातील 26 लाख लाभार्थींना आजपर्यंत लस देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने लसीकरणाचा चौथा टप्पा जाहीर केला आहे. त्यामध्ये 45 वर्षे वयापुढील नागरिकांना लस देण्याला सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे 23 टक्के लोकसंख्या ही 45 वर्षे वयापुढील आहे. त्यातील सुमारे 26 लाख नागरिकांना या आधी को-मॉर्बिड आणि 60 वर्षे वयापुढील या “कॅटेगरी’ तून लस देण्यात आली आहे.
याशिवाय पुणे जिल्ह्याची लोकसंख्या 1 कोटी 17 लाख असून, जिल्ह्यात सुमारे 26 टक्के म्हणजे सुमारे 29 लाख लाभार्थी हे 45 वर्षे वयापुढील आहेत. कोमॉर्बिडीटी आणि “सिनियर सिटीझन’ या कॅटेगरीमधून आजपर्यंत सुमारे 5 लाख 44 हजार जणांना लस देण्यात आली आहे. याशिवाय हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लसीकरण करण्यात आले आहे.
लसीकरणानंतर करोनाची बाधा; दोन ज्येष्ठांचा मृत्यू
करोना लसीकरण केल्यानंतर आठवडाभरात करोनाची लागण झालेल्या शहरातील दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक जण 78 वर्षांचे होते. लसींचे दोन डोस घेतल्यानंतर शरीरात ऍन्टिबॉडिज तयार होण्यासाठी काही कालावधी लागतो. त्यामुळे लस घेतल्यानंतरही नागरिकांनी निष्काळजी न राहता मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी आणि अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहन रुबल अग्रवाल यांनी केले आहे.
रोज 35,000 जणांना लस
दि. 1 एप्रिलपासून चौथा टप्पा सुरू होणार असल्याने, अधिकाधिक केंद्र वाढवून हे लसीकरण केले जाणार असल्याचे राज्याच्या लसीकरणाचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले. तर जिल्ह्यातही रोजचे 35 हजार लसींचे “टार्गेट’ पूर्ण करणार असल्याचे पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले.
शहरात सध्या 110 केंद्रांवर करोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. पुणे शहरात सुमारे साडेदहा लाख लोकसंख्या ही 45 वर्षे वयापुढील आहे. याचा विचार करून लसींची अधिकाअधिक उपलब्धता अधिकाधिक लसीकरण केंद्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात काही कालावधीसाठी 100 डॉक्टर्स, 100 परिचारिका आणि अन्य स्टाफ एकवट वेतनावर नेमण्यात येणार आहे.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, मनपा