जिंतूर : परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना रुग्णालयाची पूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचे दिसून आले आहे. एवढेच नाही तर जिल्ह्याच्या दुर्गम भागातून आलेल्या महिलांकडे शस्त्रक्रियेसाठी लाच मागण्यात आली अशी तक्रार देखील आली आहे.
रुग्णालयाच्या क्षमतेहून अधिक महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे सर्वांचीच गैरसोय झाली आणि महिलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. हा प्रकार जिंतूरमधील ग्रामीण भागात घडला आहे.
परभणीपासून 44 किमी अंतर असलेल्या जिंतूर या तालुक्याच्या ठिकाणी 2 आणि 3 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटर येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
ग्रामीण रुग्णालयाची एकूण क्षमता 50 बेडची असताना 100 महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना आराम करण्यासाठी कॉटदेखील उपलब्ध नव्हते. दुसऱ्या हॉलमध्ये गाद्यांची व्यवस्था करून या महिलांना आराम करण्याचे सांगितले. छताला दोऱ्या बांधून काही महिलांना सलाईन देण्यात आले. या सर्व प्रकारामुळे इथल्या भोंगळ कारभाराची आणि मिळणाऱ्या अपूर्ण सुविधेची पोलखोल झाली असल्याचे दिसत आहे.
जिंतूर रुग्णालयातील एका सेवकाने महिलांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून लाच मागितल्याची देखील तक्रार करण्यात आली आहे. जिंतूरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकिरण चोंडगे यांनी यासंबंधी कारवाईचे आदेश दिले आहेत.
परभणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रकाराची दखल घेतली असून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर जिंतूर रुग्णालयात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.