करोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी आपत्कालिन सेवा पुन्हा सज्ज
पुणे : तातडीची वैद्यकीय सेवा समजल्या जाणाऱ्या “108′ या आपत्कालिन रुग्णवाहिकेने मागील सात वर्षांत राज्यभरातील 67 लाख 70 हजार रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविल्या. त्यामध्ये 37 हजार 600 गर्भवतींना तातडीची सेवा मिळाल्याने त्यांच्यांसह त्यांच्या बाळांनाही जीवदान मिळाले. करोनामध्ये ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी “वरदान’ ठरली असून, आता करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ही आपत्कालिन सेवा पुन्हा सज्ज झाली आहे.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश तसेच जम्मू काश्मीरमध्ये 108 ही रुग्णवाहिका कार्यान्वित आहेत. याबाबत बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड, आपत्कालीन सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी ही माहिती दिली. त्यावेळी विविध राज्यांमध्ये तसेच राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, संसदेपासून ते सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलेल्या सुविधेची माहिती देण्यात आली.
राज्यात 2014 पासून ते डिसेंबर 2021 पर्यंत ही 108 रुग्णवाहिका कार्यरत आहे. दरम्यान, अनेक गर्भवती या रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्रसूत झाल्या. त्यावेळी त्यांच्या बाळासह त्यांना वैद्यकीय उपचार देऊन रुग्णालयात हलविण्यात आले, असे डॉ. शेळके यांनी सांगितले.
महाराष्ट्र, जम्मू काश्मीरमध्ये चौदाशेपेक्षा रुग्णवाहिका आणि तीसपेक्षा अधिक दुचाकी रुग्णवाहिका कार्यरत आहेत. 30 जूनपर्यंत तीन कोटी 32 लाख कॉल्स 108 या क्रमांकावर प्राप्त झाले आहेत. त्यातील 75 लाख 6 हजारांना सेवा पुरविल्या आहेत. राज्यात पुणे, मुंबई, नगर, अकोलासह अनेक जिल्ह्यांत ही रुग्णवाहिका उपलब्ध आहे.
रुग्णवाहिकेमध्ये प्रशिक्षित डॉक्टर्स असले पाहिजेत, हे धोरण भारतात सर्वात पहिल्यांदा बीव्हीजी इंडियाने अवलंबिले. त्यामुळे रुग्णांची अधिक चांगल्या पद्धतीने सेवा करण्यात तसेच प्रशिक्षण व ज्ञान व्यवस्थापनामध्ये उत्कृष्टतेचे नवे मापदंड निर्माण करण्यात मदत मिळाली. विविध सेवा क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करून सर्वोत्तम काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
हणमंतराव गायकवाड, चेअरमन,तथा कार्यकारी संचालक, बीव्हीजी इंडिया लि.