सुळका सर : शिवदुर्ग मित्र लोणावळाच्या शिरपेचात मानाचा तुरा
अवघड आणि 90 डिग्री अंशत: सरळ 350 फूट उंच असा सुळका
लोणावळा – आपत्कालीन परिस्थितीत अक्षम्य साहस दाखवीत आजवर शेकडो जणांचे प्राण वाचविण्यात यशस्वी ठरलेल्या शिवदुर्ग मित्र बचाव पथकाच्या शिवदुर्ग क्लायबींग टीममधील चार छोट्या गिर्यारोहकांनी नागफणी सुळक्यावर यशस्वीरित्या चढाई करण्याची कामगिरी नुकतीच केली आहे.
नागफणीच्या यशस्वी चढाईद्वारे शिवदुर्ग मित्र लोणावळाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम शिवदुर्ग क्लायबींग टीमच्या पुढील पिढीने केले आहे. शिवदुर्गचे छोटे गिर्यारोहक आयुष वर्तक (वय 11), अदित्य पिलाने (वय 13) रितेश कुडतरकर (वय 15) आणि हर्ष तोंडे (वय 16) यांनी अतिशय कमी वयात ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
शिवदुर्गचे गणेश गीध, रोहित वर्तक, समीर जोशी, ओंकार पडवळ, योगेश उंबरे, सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. याशिवाय या मोहिमेत सपोर्ट टीम म्हणून सनी कडू, राजेंद्र कडू, अंकुश महाडिक, प्रवीण ढोकळे, ओम हरसुले, समर्थ जरांडे, प्रिन्स बैठा, वैष्णवी भांगरे, प्रणय अंबुरे यांनी काम पाहिले.
लोणावळ्यात कुरवंडे गावाजवळ असणारा नागफणीचा सुळका ज्याला ड्यूक्स नोज म्हणूनही ओळखला जातो. अत्यंत अवघड आणि 90 डिग्री अंशत सरळ 350 फूट उंच असा सुळका आहे. चांगले कसलेल्या गिर्यारोहकांना देखील सह्याद्रीच्या घाटावर असलेल्या या सुळक्यावर चढाई करताना अनेकदा माघार घ्यावी लागते. त्यात सध्या लोणावळा शहरात पाऊस पडतच असल्याने निसरड्या झालेल्या कातळावरून चढाई करणे म्हणजे महा कठीण. मात्र अशा परिस्थितीत देखील ही मोहीम यशस्वी करणाऱ्या सर्व छोट्या गिर्यारोहकांचे लोणावळा शहरात कौतुक होत आहे.