‘टीईटी’ परीक्षेसाठी सुधारित सूचना जारी

पहिली ते आठवीच्या शिक्षकांना दोन्ही पेपर उत्तीर्ण व्हावे लागणार; पदवीचेच विषय परीक्षेला निवडणे अनिवार्य

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) उच्च प्राथमिक शिक्षक पदाच्या उमेदवारांना आता पदवीचाच विषय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबरोबरच इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांपर्यंत शिकविण्यासाठी पहिला व दुसरा असे दोन्ही पेपर उत्तीर्ण होणे आवश्‍यक करण्यात आले आहे.

शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी करण्यासाठी सन 2013 पासून “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. 15 जुलै 2018 नंतर “टीईटी’ ची एकही परीक्षा घेण्यात आलेली नाही. परीक्षेस परवानगी मिळावी यासाठी परीक्षा परिषदेकडून शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यास गेल्या महिन्यात मान्यता मिळाली आहे.

शासनाने पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केलेली आहे. यात काही अडचणी निर्माण झाल्याने “टीईटी’ परीक्षेत काही बदल निर्माण करण्याबाबतची चर्चा रंगू लागली होती. यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती. परीक्षा परिषदेकडून परीक्षेबाबत मार्गदर्शक सूचना मिळाव्यात यासाठी 3 ऑक्‍टोबर रोजी शासनाला पत्र पाठविण्यात आले होते. त्यावर अवर सचिव स्वप्नील कापडणीस यांनी नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सूचनांचे पालन करावे असे आदेशही त्यांनी जारी केले आहेत.

इयत्ता पहिली ते पाचवीच्या गटासाठी प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी शिक्षकांना “टीईटी’ परीक्षेतील पहिला पेपर उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. इयत्ता सहावी ते आठवीच्या गटातील उच्च प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी परीक्षेतील दुसरा पेपर उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. दोन्ही गटांतील शिक्षकांसाठी दोन्ही पेपर उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आली आहे.
इयत्ता सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक शिक्षकपदाच्या उमेदवारांना प्राप्त केलेल्या पदवीच्या विषयांनुसारच परीक्षा द्यावी लागणार आहे.

“टीईटी’ परीक्षा मार्चपर्यंत लांबणीवर पडणार
“टीईटी’ परीक्षा घेण्याच्या नियोजनासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 12 जानेवारी रोजी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, अद्याप वेळापत्रक निश्‍चित करण्यात आलेले नाही. 16 फेब्रुवारीला इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आहे. या परीक्षेच्या नियोजनात अधिकारी, कर्मचारी वर्ग व्यस्त असणार आहे. त्यामुळे कदाचित “टीईटी’ परीक्षा मार्चपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here