कराड -तळमावले ता. पाटण येथील शाहरूख मुल्ला या 19 वर्षाच्या अवलियाने आपल्या जुन्या सायकलला दुचाकीचे स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची ही “मिनी दुचाकी’ तळमावलेसह ढेबेवाडी खोऱ्यातील सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
तळमावले येथील दिलावर मुल्ला यांचे मुळगाव कुंभारगाव. नोकरीनिमित्त ते मुंबई येथे स्थायिक झाले होते. मात्र, त्यांना अस्थमाचा त्रास असल्याने सन 2016 मध्ये ते आपल्या गावी परतले. मात्र, कुटूंबाचा चरितार्थाचा विचार करून त्यांनी तळमावले येथे कटलरीचे दुकान सुरू केले. त्यांचा मुलगा शाहरूख याला लहानपणापासूनच सायकलची खूप हौस होती. मुंबई येथे वास्तव्यास असताना इतर मित्रांच्या सायकली घेऊन तो फिरवत असे. त्याची ही इच्छा पाहून दिलावर मुल्ला यांनी आपल्या मुलाला सायकल घेऊन देण्याचे ठरवले.
गावी गेल्यानंतर 2018 मध्ये त्यांनी शाहरूखला चांगल्या कंपनीची सायकल घेऊन दिली. त्यामुळे तो खूप खुष झाला. त्याचे अभ्यासात मन रमत नसल्याने नववीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्याने तळमावले येथीलच गॅरेजमध्ये नोकरी स्विकारली. तेथे काम करीत असताना दुचाकीच्या प्रत्येक पार्टची त्याला माहिती मिळत गेली.
या पार्टच्या माध्यमातून आपणही आपल्या सायकलला वेगळा लुक देऊ शकतो. असे त्याच्या डोक्यात आले. त्याने ती इच्छा त्याच्या वडिलांसमोर बोलून दाखवली. त्यांनीही ते लगेच मान्य करून कराड शहरात काय साहित्य मिळू शकते याची चौकशी केली.
नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांनी सायकलला एक-एक पार्ट जोडण्याचा प्रयत्न केला. आपल्या दैनंदिन कामातून वेळ मिळेल तसा त्या दोघांनीही सायकलला कोणते पार्ट जोडू शकतो याचा शोध सुरू ठेवला. आज त्यांनी सायकलला 12 व्होल्टची हेड लाईट, म्युझिक सिस्टिम, इंडिकेटर, हॉर्न, ब्रेक लाईट, आकर्षक आरसे व कॅरिअर बसवले आहेत. त्यामुळे त्याच्या सायकलचे पूर्णपणे रूपडे पालटले आहे.
त्याला बसवलेल्या बॅटऱ्यांमुळे कामावरून जाताना रात्री उशिर झाल्यास त्याला त्याचा उपयोग होतो. तसेच म्युझिक सिस्टीममुळे मनोरंजनही होते. त्याच्या या सायकलचे अनेकांना अप्रुप वाटत आहे. 19 वर्षाच्या शाहरूखचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच ही सायकल पाहण्याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.