सोसायटीला फतवा : सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचा प्रताप
पुणे – ‘सोसायटीत पाच करोनाबाधित सापडल्याने संपूर्ण सोसायटीनेच करोना चाचणी करून घ्या, अन्यथा प्रत्येक कुटूंबाला 3 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल,’ अशी नोटीस सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाने एका सोसायटीला बजावली आहे. ही नोटीस बेकायदा असल्याचा आक्षेप सोसायटीने घेतला असून, अशी बळजबरी करू नये, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. या प्रकारावरून अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनीही ही नोटीस चुकीची असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्यांना समज देणार असल्याचे म्हटले आहे.
सहकारनगरमधील “रुतुरंग’ नावाची सोसायटी असून त्यात 84 फ्लॅटधारक आहेत. या सोसायटीच्या फेज-2 मध्ये करोनाचे सात बाधित दोन आठवड्यांपूर्वी आढळले आहेत. त्यावर धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी या सोसायटीला नोटीस दिली आहे. त्यात “सोसायटीतील सर्व कुटुंबानी करोनाची चाचणी करणे अनिवार्य आहे. ही तपासणी महापालिकेच्या वतीने करण्यात येईल.
मात्र, जे कुटुंब सहकार्य करणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाला 3 हजार रुपयांचा दंड करून तो मिळकतकरात समाविष्ट करण्यात येईल,’ असे म्हटले आहे. त्यामुळे सोसायटीमधील सर्वच रहिवाशांनी या नोटीसला आक्षेप घेतला आहे. “जे बाधित सापडले, त्यांच्या संर्पकात आलेल्या व्यक्तींची चाचणी करण्यास आमची हरकत नाही. मात्र, लॉकडाऊनमुळे तसेच करोनाच्या भीतीने अनेकांनी सोशल डिस्टंन्सचे नियम पाळले असून अनेक जणांचा बाधितांशी काहीही संबध नाही. तसेच लक्षणे नसल्यास आणि थेट संपर्कात आलेले नसल्यास चाचणीची गरज नसल्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. चाचणीसाठी बळजबरी करणे योग्य नाही,’ असे रहिवाशांचे म्हणणे आहे.