वाराणसी – करोनाच्या दुसऱ्या लाटेतील ढिसाळ व्यवस्थापनाबद्दल टीकेची झोड सहन करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काही दिवसांपूर्वी बूस्टर मिळाला. करोना काळात योगी सरकारच्या प्रयत्नांचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदींनी योगींच्या कामगिरीची प्रशंसा केली. देशात करोनाकाळात सर्वाधिक चाचण्या करणारे उत्तर प्रदेश हे सर्वात वरच्या क्रमांकाचे राज्य ठरल्याचा उल्लेखही यावेळी पंतप्रधानांनी आवर्जून केला.
असे असतांना पुन्हा एकदा ढिसाळ व्यवस्थापनाबद्दलचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यातील गावात आपल्या वडिलांचा मृतदेह बाईकवरून घेऊन चालल्याचा फोटो सध्या देशभर चर्चेत आहे. यावरून देशभरातून पुन्हा एकदा योगी सरकारवर टीका केली जात आहे.
दरम्यान, व्हायरल फोटोमधील संबंधित मुलांशी स्थानिक पत्रकरांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले ,’वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे आम्ही अँब्युलन्सला फोन लावला. मात्र अऩेक प्रयत्न करूनही अँम्ब्युलन्स आलीच नाही. यावेळी वेळ न घालवता आम्ही वडिलांना बाईकवरून हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला.
ते पुढे म्हणाले,’हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर डॉक्टरांनी उपचारा साठी उशिरा केल्यामुळे त्यांचा वडिलांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यूनंतरही मुलांनी पार्थिव घरी नेण्यासाठी पुन्हा अँब्युलन्सला फोन लावला. मात्र यावेळीही अँम्ब्युलन्स मिळाली नाही. त्यामुळे सुन्न झालेल्या मुलांनी बाईकवरूनच वडिलांचा मृतदेह नेण्याचा निर्णय घेतला.असेही त्यांनी सांगितले.
ही घटना पाहून तिथल्या उपस्थितांचं काळीज हेलावलं आणि अऩेकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. सध्या या घटनेवरून सोशलवर योगी सरकारवर टीका केली जात आहे. उत्तर प्रदेश हे संपूर्ण देशात सर्वाधिक लसीकरण करणारे राज्यही बनलंय. करोनाच्या दुसऱ्या लाटेला यूपी सरकारने चांगल्या पद्धतीने हाताळल्याचा दावा त्यांनी केला. या दाव्यावर सोशवरुन टीका केली जात आहे.