पारनेर (प्रतिनिधी) – सुपा-पारनेर रोडवर बाजारतळ परिसरात गर्दीत रस्त्याच्या आजूबाजूला वाकडीतिकडी वाहने लावल्याने एक रुग्णवाहिका अडकली. यावेळी रुग्णांची गैरसोय झाली. गर्दीच्या वेळी या भागात वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
सुपा येथे बुधवारी आठवडे बाजार असतो, त्यामुळे सुपा बसस्थानक ते पारनेर रोडवर दोन्ही बाजूने विक्रेते बसतात. अशातच चालक आपली दोनचाकी, चारचाकी वाहनेही रोडलगत कुठेही वाकडीतिकडी लावतात. मुळात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असल्याने रस्ता अरुंद, त्यात बाजाराची गर्दी, रस्त्याच्या दुतर्फा विक्रेते बसलेले व त्यांचे ग्राहक व वाकडीतिकडी लावलेली वाहने यामुळे प्रत्येक बुधवारी सुपा बाजारतळ परिसरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. बुधवारी यातच एक रुग्णवाहिका अडकली होती.
सुपा-पारनेर रोडला वाहतूक कोंडी ठरलेलीच आहे. रोज सकाळ- संध्याकाळ व बुधवारी दिवसभर या रोडवर गर्दी असल्याने वाहतूक कोंडी होते. बुधवारी दिवसभर या भागात पोलिसांची नेमणूक करावी, जेणेकरून वाहतूक सुरळीत चालू राहील, अशी नागरिकांची मागणी आहे. कारण वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी अडकतात.
त्याच बरोबर गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोर हात साफ करत असतात. गर्दीचा फायदा घेऊन यापूर्वी मोबाईलसह लहान-मोठ्या चोऱ्या याठिकाणी झाल्या आहेत. सुपा पोलिसांनी बुधवारी दिवसभर व इतर दिवशी सकाळ संध्याकाळ या भागात पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर व रस्त्याच्या बाजूने वाकडीतिकडी वाहने लावली जातात. त्यांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.