- उपसरपंच स्वप्नील काळोखे आणि पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब काळोखे यांनी दिली मदत
देहूगाव – अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या ऐतिहासिक श्रीराम मंदिरासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या श्रीक्षेत्र देहूतून आर्थिक स्वरुपातील मदतीचा ओघ सुरू झाला आहे. देहूगावचे उपसरपंच स्वप्नील काळोखे यांनी, तर पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब काळोखे यांच्या वतीने श्रीराम मंदिरासाठी प्रत्येकी एक लाख एक हजार एकशे अकरा (1,1,111) रुपयांचा धनादेश पंढरपूर देवस्थान समितीचे विश्वस्त हभप शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते विश्व हिंदू परिषदचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख श्रीरंग राजे, हेमंत हरहरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
अयोध्या येथे भव्यदिव्य असे श्रीराम मंदिर उभारण्यात येत आहे. देशभरातून रामभक्तांकडून निधी दिला आहेत. तीर्थक्षेत्र देहूगावातून प्रथम उपसरपंच स्वप्नील काळोखे यांनी एक लाख रुपयांचा निधी श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी दिला आहे. त्याबद्दल काळोखे यांचे विश्वहिंदू परिषदेच्या वतीने अभिनंदन आणि कौतुक केले. धार्मिक कार्याबाबतचा त्यांचा आदर्श अन्य नागरिकांनी घ्यावा, असे प्रतिपादन राजे यांनी यावेळी केले.
स्वप्नील काळोखे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले श्रीराम मंदिर उभारण्याचे काम मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे. देशभरातून मंदिर उभारण्यासाठी निधी दिला जात आहे. या पवित्र कार्याला तीर्थक्षेत्र देहूतून आपलाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने गावातून प्रथमच एक लाखाचा निधी दिल्याचे श्रीराम मंदिर उभारण्यासाठी दिला आहे.
तसेच राममंदिराचे कार्य पूर्ण झाल्यावर देहूतील 101 भक्तांना रामजन्मभूमीत स्व:खर्चाने श्रीरामाचे दर्शन घडवून आणू, असा संकल्प ठेवला आहे.